आमदार व नेत्यांना शिवीगाळ, धमकी प्रकरणी माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल.!

 

Purandar Reporter Live 

दौंड : प्रतिनिधि 

                      पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये राजकीय वातावरण तापले असून, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी तसेच आमदार गोपीचंद पडळकर आणि महेश लांडगे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेष म्हणजे, शेखने या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन 'झोडपण्याची' थेट धमकी दिली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

           दरम्यान ही घटना २७ जून रोजी घडली, जेव्हा मुस्लिम समाजाच्या वतीने दौंड पोलिस ठाण्यावर एका निषेध मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील काही आमदार आणि भाजप पदाधिकारी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधाने करत असल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान बोलताना बादशहा शेख यांनी संतप्त भाषणात ही आक्षेपार्ह विधाने केली. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याचा आणि त्यांना झोडपण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच, जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याविषयीही त्यांनी अपशब्द वापरले, तसेच गलिच्छ, आक्षेपार्ह भाषेत भाषण केल्यामुळे समाजात दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप आहे.


                              बादशहा शेखचा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर या प्रकरणी नीलेश बांगरे यांनी २८ जून रोजी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शेखवर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९२, ३५१-३, ३५२ आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दौंड पोलिस ठाण्याबाहेरच ही धमकी दिल्यानंतरही दौंड पोलिसांनी २८ जूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या, अहिल्यानगर पोलिसांचे पथक बादशहा शेखच्या शोधात असून, ते सध्या फरार आहे.

Post a Comment

0 Comments